विठ्ठलाची खरी मुर्ति पंढरपुरात कि माढ्यात?

‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’- रा. चिं. ढेरे

माढ्याचे विठ्ठल मंदिर आणि मूळ मूर्तीचा वाद.

रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या गावात झाला. हे मराठी इतिहास-संशोधक व लेखक होते. ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथासाठी १९८७ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. विठ्ठलाची मुर्ति माढा हे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. पण कुर्डुवाडीला रेल्वेचे जंक्शन झाले आणि माढ्याचे महत्त्व ओसरले. पण निंबाळकरांची जहागिरी असणाऱ्या माढ्यातील हे विठ्ठलमंदिर रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या संशोधनाने अचानक प्रकाशात आले. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके लोकदैवत, पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणुन पण प्रसिध्द आहे. पंढरपूरचा पांडुरंग अनेकांचा श्रद्धेचा विषय. जातीभेद कर्मकांडाच्या पुढे जाऊन सर्व वारकरी आणि भक्तमंडळींची तसेच अराध्य दैवताची पुजा आठशे नऊशे वर्षापासून चालूच आहे.

संत ज्ञानेश्वर ते संत तुकारामांपर्यंत अनेक संतांनी पांडुरंगाचे वर्णन करणा-या अनेक रचना केल्या आहेत. पण हे ही तितकेच खरे आहे की या मूर्तीबददल वारकरी व जनसमुदायामध्ये अनेक गैरसमज आहेत, मूर्तीबाबत मतमतांतरे आहेत. असे असले तरी अनेक आवडत्या नावडत्या गोष्टी पंढरीत घडल्या आहेत. पांडुरंगाचे दर्शन सर्वसामान्यासाठी खुले झाले तेव्हा पांडुरंगाचा आत्मा एका माठात काढून ठेवल्याने आता मुर्तीत देवत्व राहिले नाही अशा घटनेने सर्व सामान्यांची असलेली श्रद्धा डळमळीत झालेली आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी सानेगुरुजींनी प्राणांतिक उपोषण सुरु केले होते. मंदिर प्रवेशामुळे मोठा गदारोळ माजला होता. पुजार्‍यांनी दलितांना प्रवेश देऊ नये म्हणून प्रकरण न्यायालयात नेले. तिथे त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली. शासकीय आदेशानुसार विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले झाले. पण कट्टर पुजार्‍यांना ती गोष्ट काही मान्य झाली नाही. मंदिरात दलितांनी प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीची महापूजा करुन मूर्तीतील देवत्त्व काढून एका घागरीत ठेवले. पुढे ती घागर एका वाड्यात ठेवण्यात आली. एकादशीला कर्मठ लोक त्या माठाची पूजा करत असायचे. अर्थात दर्शनार्थी प्रचलित मूर्तीचीच पूजा करीत होते. पुढे कर्मठ लोकांना पश्चाताप झाला ती गोष्ट वेगळी.

विठ्ठल मुर्तीचे अनेक वेळा अनेक कारणाने स्थलांतर झाल्याचे इतिहासात नमुद केलेले आहे. औरंगजेब जेव्हा ब्रह्मगिरीपर्यंत हिंदुची एकेक देवळे फोडत आला तेव्हा बडव्यांनी विठ्ठलमुर्तीला पंढरपूरजवळ ‘देगाव’ नावाचे गाव आहे तेथील बडव्यांकडे विठ्ठल मुर्ति दिली तिथल्या बडव्यांनी संकटाच्या वेळी मृर्तीला तिथल्या पाटील देशमुखाकडे हलविले व ग्रामपंचायतीच्या मदतीने ती मुर्ती विहिरीत लपविली होती. पुढे आक्रमण परतल्यावर ती मुर्ती पुन्हा पंढरपुरवासियांच्या विनंतीवरुन पंढरपूरला आणन्यात आली. चिंचोली, गुळसरे, अशा गावीही ती मूर्ती हलविली गेली आहे. ” एकदा तर एका बडव्यानेच मुद्दाम मूर्ती पळवून नेऊन आणि लपवून ठेवून स्वार्थसाधनासाठी दर्शनोत्सुक भक्तांची अडवणूक केली होती.”
सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठ्ठलमूर्ती आपल्या राज्यात नेली. भव्य मंदिर बांधून त्यात विठ्ठलमुर्तीची स्थापनाही केली. पुढे वारीला जेव्हा संतमंडळी आली तेव्हा त्यांना विठ्ठल मुर्ती दिसली नाही त्यांच्याबरोबर भक्तमंडळीही व्याकूळ झाली आणि या भक्तजनांनी एकनाथमहाराजांचे आजोबा भानुदास महाराज यांना मूर्ती परत आनण्याची विनवणी केली. भानुदास महाराजांनी कृष्णदेवरायांचे मन पूरिवर्त्न करुन विठलमूर्ती परत आणली. अशी कथा आहे.

विठोबाची मूर्ती भिलसाजवळील उदयगिरी लेण्यातील तिसऱ्या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठलमूर्तीच्या वर्णनाशी सध्याच्या मूर्तीचे वर्णन जुळत नाही

अफझलखानाने १६५९ मध्ये केलेल्‍या आक्रमणाच्या वेळी अफजलखानाच्या हाती मुर्ती येणार होती त्यापूर्वीच बडव्यांनी पंढरपूरची मूर्ती माढा येथे हलवली होती, अशीही पारंपरिक माहिती आहे. पंढरपूरहून वीस मैल असलेल्या ‘माढा’ या गावी [जि.सोलापूर] येथे नेऊन ठेवली. वर ह्या गंडांतराच्या स्मरणार्थ माढ्यात विठोबाचे एक स्वतंत्र देऊळ व मूर्ती स्थापण्यात आली. पुढे ती मूर्ती पंढरपूरला आणल्या गेली का ? पंढरपूरातली पांडुरंगाची मूर्ती ती आद्य मूर्ती का ? या विषयावर श्री रा.चि.ढेरे यांनी श्री विठ्ठल एक महासमन्व्यक हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे त्यात ते अनेक संदर्भ ग्रंथावरुन त्यांनी माढ्याची विठ्ठलाची मूर्ती ही आद्य मूर्ती ठरवली आहे. त्यांचे केसरी मधील दोन लेखांनी [वर्ष १९८२] महाराष्ट्रभर वैचारिक धुमाकूळ घातला होता असे म्हणतात.

या साऱ्याचे शास्त्रीय विवेचन करत रा. चिं. ढेरे यांनी असे मांडले, की माढा येथील मूर्ती आद्यमूर्तीशी साम्य सांगते श्री रा. चि. ढेरे यांनी या विषयावर मोठे संशोधन केलेले आहे. यासाठी ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ हा ग्रंथ लिहून जानकार जनसमुदायाला विठ्ठल मुर्ति विषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला या ग्रंथासाठी १९८७ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. आणि ते मला पटणारे आहे. विठ्ठलतेच्या अचूक निरीक्षणावरुन मूळ मूर्ती माढ्यालाच आहे असे त्यांचे म्हणने आहे.

स्कंदपुराणातील ‘पांडुरंगमहात्म्य’ या संस्कृत रचनेपासून ते संत सावता माळी यांच्या अभंगापर्यंत पंढरपूरच्या विठ्ठलाचे जे वर्णन सापडते, तशी मूर्ती पंढरपुरात नाही. हृदयस्थानावर कोरलेला कुटमंत्र हे त्या मूर्तीर्चे महत्त्वाचे वर्णन आहे. तशी मूर्ती माढा येथे आहे.

सावता माळ्याच्या अप्रकाशित अभंगातील दाखला त्या मूर्तीबाबत दिल्या जातो. तो अभंग असा-

विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ । -दयकमळ मंत्रसिद्ध ॥
दिगंबर मूर्ती गोजरी सांवळी । तोडे पायी वाळी मनगटी ॥
कटीवर हात, हाती पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलीत ॥
सावता माळी म्हणे शब्दब्रह्म । नाम विठ्ठलाचे कलियुगीं ॥

सावता माळ्याला [महाराजांना ] जसे रुप दिसले तसे त्यांनी वर्णन केले आहे. विठ्ठल कसा आहे तर दिगंबर आहे. वर्ण सावळा आहे. त्याच्या पायात तोडे आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. या सर्व
वर्णनापेक्षा दिगंबरत्व ह्या मुद्याकडे श्री. रा.चि. ढेरे आपले लक्ष वेधतात. मस्तकावर गवळी टोपी. दोन्ही कानात शंखाकार कुंडले. गळ्यात कौस्तुभमणी, डाव्या हातात शंख. उजव्या हाताच्या तळवा काठीवर टेकवलेला. मनगटावर कडे. आणि विठ्ठलाच्या वक्ष:स्थळावर मंत्राक्षर आपल्याला दिसतात.
” श्री स्पर्शाद्यं सत्यनामाद्यं
षणषटु सदीर्घकं || ष
टषटू दिनंत्यंतं स
सारं तं विदर्बु
धा: || श्री
वत्स”

असा हा कुटमंत्र माढ्याच्या विठ्ठलाच्या छातीवर कोरलेला स्पष्टपणे पाहता येतो.
प्रचलित पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीत अशी कोणतीही ओळख दिसत नाही.

ज्या शिळेपासून माढ्याचा विठ्ठल घडलेला दिसतो त्याच शिळेपासून रुक्मिणी घडलेली असेल कि नाही पण पंढरपुरातिल पांडुरंगाची शिळा (तुलनेने) खडबडीत आहे. माढा येथील मूर्ती खडबडीत नाही. सध्याची पंढरपूर येथील पांडुरंग मूर्ती खडबडीत वाटते. दर्शनामुळे किंवा नारळ ठेवल्यामुळे पाय खडबडीत होतील, पण संपूर्ण अंग का खडबडीत असेल का हा प्रश्नच आहे खरा.. इतक्या वर्षापासून वेगवेगळ्या अभिषकामुळे त्याची झीज झाली असावी असाही मुद्दा रेटता येतो. पण ज्या शिळेपासून माढ्याचा विठ्ठल घडलेला दिसतो त्याच शिळेपासून रुक्मिणी घडलेली दिसते.

या साऱ्याचे शास्त्रीय विवेचन करत रा. चिं. ढेरे यांनी असे मांडले, की माढा येथील मूर्ती आद्यमूर्तीशी साम्य सांगते
आणि श्री. रा.चि. ढेरे ज्या ”पांडुरंगमाहात्म्य” चा संदर्भ देतात आणि आद्य मूर्तीची जी लक्षणे सांगतात ती अशी

”१) मूर्तीच्या -हदयावर देवाचा नाममंत्र कूटश्लोकात कोरलेला आहे.
२) मूर्तीच्या भाळावर तृतीय नेत्र आहे. आणि-
३) मूर्ती दिगंबर बालगोपालाची आहे”

ही तिन्ही लक्षणे आजच्या पंढरपूर मूर्तीत नाही. ती सर्व लक्षणे माढ्याच्या मूर्तीत दिसतात. अर्थात, मंदिरातल्या देव वगैरे अशा गोष्टींवर माझा विश्वास नसला तरी फक्त मुर्तिच्या बाबतीत बोलायचेच असेल तर रा. चिं ढेरे यांनी क्षणाक्षणाला असंख्य पुरावे सांगितल्यावर माढा या ठिकाणची विठ्ठलाची मुर्ति खरी असा विश्वास आहे. ”त्यामुळे कोणाची श्रद्धा दुखावण्याचे मलाही कारण नाही. फक्त आपण कधी माढ्याला गेलात तर याही विठ्ठल मूर्तीची आणि आपली भेट व्हावी त्यासाठी हा प्रपंच.

पंढरीच्या वाटेवर असलेल्या माढ्यातील विठ्ठलाच्या मुर्तिची ज्यांना माहिती आहे. ते वाट वाकडी करून माढ्याच्या त्या देवळापर्यंत पोचतात.

श्री विट्ठल एक महासमन्वय हे ढेरे यांचे पुस्तक अत्यंत वाचनीय आहेच पण त्यांची बाकीची सर्वच पुस्तके इतिहासाच्या आणि नाथ ,दत्त आणि शाक्त संप्रदायांच्या अभ्यासकांनी जरूर वाचावींत अशी आहेत. त्यांचे लिखाण, सहज सोपे, प्रासादिक आणि नेमक्या शब्दांत आशय व्यक्त करणारे असते. समर्पक शब्दांचा वापर हे आणखी एक वैशिष्ट्य. ते कुठल्याही रूढी/कल्पनांचे दैवीकरण अथवा उदो उदो करीत नाहीत तर उलट दैवतांच्या मूळ मानवी स्वरूपाचा वेध घेतात. कुणाच्याही भावना न दुखवता अलगद श्रद्धां-परंपरांच्याच्या मुळाशी जाऊन सत्य शोधण्याचा त्यांचा प्रयत्न अभिनव आहे. हे पितृतुल्य व्यक्तिमत्व आपल्यात वावरते आहे हे आपल्या पिढीचे अहोभाग्य आहे.

इतिहास सोयीने बदलला जातो परंपरेने एकच विचार पुढे येतो तेव्हा दुसरा विचार रूजायला वेळ लागतो. ३३ कोटी देव म्हटले जाते; पण खरे ३३ प्रकारचे देव आहेत असे जाणकार लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करून सांगितले तर त्यांना ते पटते; पण सामान्य लोकांच्या पचनी ते पडत नाही. अभ्यासकांना माहिती असूनही लोकांच्या श्रद्धेला तडा जाऊ नये म्हणून कोणी बोलत नाही, शंशोधन करण्याचे कोणी धाडस करित नाही. एखाद्या विषयाची माहिती आसताना खरी माहीती कोणीही सांगण्याचा प्रयत्न करित नाही व लिहीत पण नाही.

पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती खरी की पंढरपूरजवळच्या माढा तालूक्याच्या ठिकाणची? या डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या संशोधनावरून ऐंशीच्या दशकात मोठा वाद झाला. वादाला कित्येक वर्षे उलटून गेली आहेत.

ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व प्रख्यात इतिहास संशोधक रामचंद्र चिंतामण तथा रा. चिं. ढेरे यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. तेव्हा ते ८७ वर्षांचे होते. ढेरे यांच्या निधनानं नव्या पिढीला इतिहासाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यांनी केलेले संशोधन अनेक अभ्यासकांना आणि जिज्ञासूंना एका नव्या वाटेकडे बोट दाखवत उभे आहे, पण त्यांची परंपरा कायम ठेवत सत्याचा शोध घेणारे ते संशोधन पुढे चालू आहे असे सांगणारे ठोसपणे दिसत नाही. ‘त्या’ वादानंतर चंद्रभागेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. संशोधनाची माध्यमे बदलली आहेत, विज्ञान पुढे गेले आहे. नव्या साधनांचा उपयोग करून सत्यान्वेषी संशोधनाची पालखी नव्या खांद्यांवर विसावायला हवी होती तसे काही झाले नाही.

वादात आणखी एक मुद्दा माढ्यातील देवळाचे पुजारी उत्कर्ष कुंभेजकर मत मांडतात. ते म्हणतात, की पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीच्या आणि रुख्मिणीमातीच्या दगडात फरक जाणवतो. पण पंढरपूरच्या रुख्मिणीमातेचा दगड आणि माढ्यातील विठ्ठलमूर्तीचा दगड सारखा वाटतो. कदाचित ते शिल्पकलेच्या अभ्यासकांना स्पष्टपणे मांडता येईल. त्या दिशेने अधिक अभ्यास व्हायला हवा.

कारण कितीही अप्रिय असले तरी ‘सत्याची कास’ धरणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. अशा वादांना न डगमगता महाराष्ट्राने अनेकदा कटू सत्य मांडले आहे, पचवलेले आहे. म्हणूनच मराठी मनाने तरी विठ्ठलाच्या मुर्तिचा हा अभ्यास अखंड सुरू ठेवायला हवा.

श्री. रा.चि.ढेर्‍यांनीच त्यावर काम केले आहे असे वाटते. संशोधनातील निष्कर्षे काही अंतिम असत नाही. त्यामुळे अजूनही संशोधनाला वाव आहेच. श्री रा.चि.ढेर्‍यांच्या या संशोधनावर ‘सवंग लेखन’ म्हणूनही खूप टीका झाली होती. सरकार असे काही काम करेल असे वाटत नाही.

विशेष सुचना:- वरिल सर्व माहीती विविध वर्तमानपत्रे, पुस्तके, आणि इतर मजकूर व बातम्या अशा माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून सदर माहिती जमा करीत आसताना या मध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सुचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा. malagerohidasshivaji3@gmail.com

-®रोशिम.✍️

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started