चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर ५० वर्षं प्रेयसीची वाट पाहणारा महान कलाकार – केकी मुस

कैकुश्रु माणेकजी ऊर्फ केकी मूस

१४ फेब्रुवारी, हा दिवस दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी खास असतो. ते या दिवशी आपल्या प्रेमाची कबुली देतात आणि एकमेकांसोबत रोमॅन्टीक वेळ घालवतात. प्रत्येक प्रेम करणाऱ्यां युवकांची ही कहाणी त्यांच्यासाठी खास असते. हेच ते क्षण असतात, जे प्रेमी युगुल नेहमीच आपल्या आठवणीत साठवून ठेवतात आणि या आठवणी संपूर्ण आयुष्यभर घालवतात. या प्रसंगी एक अशी प्रेमकहाणी आहे. जी क्वचित काही लोकांना माहित असेल. एखादी दंतकथा वाटावी अशीच केकी मूस यांची ही प्रेमकथा.

50 वर्षांत फक्त दोनदाच घराबाहेर पडले केकी मुस

केकी मुस 50 वर्षात फक्त दोनच वेळा घराबाहेर पडले. याबाबत बीबीसी मराठीशी चर्चा करताना कमलाकर सामंत यांनी म्हटलंय, “केकींनी 50 वर्षांचा बंदिवास स्वतः स्वीकारला होता.

1939 पासून ते 1989 या 50 वर्षांच्या काळात ते फक्त दोनदाच घराबाहेर पडले होते.

एकदा 1957 ला त्यांच्या आईच्या अंत्यविधीसाठी ते औरंगाबादला गेले होते. तर दुसऱ्यांदा भूदान चळवळीदरम्यान विनोबा भावेंचं व्यक्तीचित्र घेण्यासाठी 1970 दरम्यान ते चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या वेटींग रूममध्ये गेले होते. खरंतर विनोबा भावेंचें भाऊ शिवाजी नरहर भावे हे केकींचे खास मित्र होते. त्यामुळे शिवाजीरावांच्या आग्रहाखातर ते घराबाहेर पडले होते.”

“भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केकींना चाळीसगावच्या रेल्वे स्थानकावर भेटायला बोलवलं होतं. तेव्हा त्यांच्या आमंत्रणासही त्यांनी नम्रपणे नकार दिला होता. शिवाय त्यांनाच निरोप पाठवला होता की तुम्हाला जर माझ्या हातून व्यक्ती चित्र तयार करून हवं असेल तर तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. माझ्या घरात तुमचं स्वागत आहे. तेव्हा स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू केकींना भेटायला त्यांच्या घरी आले होते.” असंही सामंत पुढे म्हणाले.

केकी मुस जरी घराबाहेर पडत नसले तरी अनेक दिग्गज मंडळी केकींना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांच्या घरी येत असत. यामध्ये जवाहरलाल नेहरू, बाबा आमटे, आचार्य अत्रे, ना. सी. फडके, जयप्रकाश नारायण, साने गुरुजी, महर्षी धोडो केशव कर्वे, वसंत देसाई, पंडित महादेवशास्त्री जोशी, श्री. म. माटे, बालगंधर्व अशा अनेक लोकांचा समावेश आहे. यातील बहुतेक व्यक्तींचे केकींनी काढलेले छायाचित्र त्यांच्या संग्रहालयात आहे

ही प्रेमकहाणी आहे जागतिक कीर्तीचे छायाचित्रकार केकी मूस यांची. प्रेयसीनं दिलेल्या वचनावर विश्वास ठेवून जवळपास ५० वर्ष आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या येण्याची वाट पाहणारा हा प्रियकर दररोज पंजाब मेल ही रेल्वे गाडी येऊन गेल्याशिवाय जेवत नसत. ऐवढेच काय तर ती ट्रेन स्टेशनवर येऊन गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून नेहमी अश्रू येत असत.

खान्देशातील कलामहर्षी केकी मूस या महान कलाकारानं प्रेमात प्रियसीच्या आठवणीत चाळीसगावमध्ये ‘मूस आर्ट गॅलरी’ निर्माण केली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपल्या प्रियेशीची वाट पाहिली. प्रेमात या कलाकाराने निर्माण केलेली कलासृष्टी म्हणजेच चाळीसगावची ‘मूस आर्ट गॅलरी’!

कलामहर्षी केकी मूस कलादालनाचे विश्वस्त व कार्यकारणी सचिव कमलाकर सामंत हे त्यांच्या शालेय जीवनात केकी मूस यांना पहिल्यांदा चाळीसगावमध्येच भेटले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील विल्सन कॉलेजमधून केकी मुस यांनी कलेची पदवी घेतली. यादर्मान्य त्यांचं निलोफर नावाच्या मुलीवर प्रेम जडलं. सुरुवातीला निलोफर आणि केकी मुस यांच्यात फक्त मैत्री होती, परंतु ही मैत्री प्रेमात कधी बदलली हे दोघांनाही कळलं नाही. केकीं मुस यांनी जेव्हा मुंबई सोडून चाळीसगावला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची प्रेयसीही त्यांच्यासोबत येणार होती. ते दोघं लग्न करणार होते, मात्र या लग्नाला निलोफरच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे नीलोफरच्या घरच्यांनी केकी मुसला नापसंती दर्शविली व  केकीं मुस सोबत निलोफर ला न पाठवण्याचा निर्णय घेतला.

१९३८ मध्ये केकी मुस यांनी चाळीसगावातील आपले वडिलोपार्जित घरी जाण्याचे ठरवीले केकी मुस ज्या दिवशी एकटेच मुंबई सोडून चाळीसगावला जाण्यासाठी निघाले त्या दिवशी त्यांची प्रेयसी निलोफर यांना तसे समजले निलोफर केकी मुस ला मुंबईच्या व्हिक्टोरिया स्टेशनवर म्हणजे आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वर निरोप द्यायला आली होती. तेव्हा निलोफरनं केकी मूस यांचा हात हातात घेऊन त्यांना वचन दिलं की, एक ना एक दिवस ती नक्की याच गाडीने (पंजाब मेलनं ) चाळीसगावला येईन आणि आपण दोघे आयुष्यभर सोबत राहू व सोबतच दररोजचे जेवण करीत जाऊ. आता सध्याला आई वडीलांचा आपल्या लग्नाला विशेध आहे त्यांची समजूत काढून मी नक्कीच येईन.

त्यामुळे प्रेयसीनं दिलेल्या वचनावर विश्वास असलेले केकी मूस दिवसभर बंद असलेली बंगल्याची सगळी दारं-खिडक्या रेल्वेगाडी येण्याच्या वेळेला उघडत असत. दिवे लावत असत.

लंडनहून येणारी फ्लाईट मुंबईला संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी यायची, वन डाऊन म्हणजे पंजाब मेल मुंबईहून बरोबर आंधार पडल्या नंतर सुटायची आणि मध्यरात्री चाळीसगावला यायची. रात्रीचा एक वाजायला आला की, केकी अस्वस्थ होत असत, ते बंगल्याची दारे खिडक्या उघडत आणि संध्याकाळीच आपल्याच बागेतील दुर्मिळ स्वच्छ ताजी फूले खुडून ठेवलेल्या गुलछडीच्या फुलांचा एक गुच्छ व्हरांड्यात आणून ठेवत असत. आणि प्रियेसिची वाट पाहत बसत व डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंना वाट मोकळी करून देत असत प्रियेसीची वाट पाहून झाल्यावरच ते रात्रीचे जेवण करीत असत.

नंतर नंतर जेव्हा त्यांच्या बागेतील फुलं कमी झाली तेव्हा त्यांनी शोभेच्या कागदी फुलांचा एक गुच्छ कायमचाच तयार करून ठेवला होता.

तसेच रोज रात्री दोन व्यक्तींच्या जेवनाची म्हणजेच प्रियेसी निलोफर च्या जेवणाची तयारीसुद्धा ते करून ठेवत असत. अशाप्रकारे त्यांच्या प्रेयसी निलोफरच्या स्वागताची ते रोज न चुकता तयारी करून ठेवत असत. केकी मुस पन्नास वर्ष निलोफर ची वाट पाहत या खिडकीतून सतत रंग न्याहाळत राहीले अगदी डोळे म्हातारे होईपर्यंत निलोफर ची वाट पाहत राहीले.

“त्यांनी प्रेयसीला दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळला. दररोज पंजाबमेल रेल्वे गाडी गेल्यानंतरच ते जेवायचे. ३१ डिसेंबर १९८९ या त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या रात्रीचं जेवण देखील त्यांनी पंजाब मेल गेल्यावरच घेतलं होतं.”

निलोफर आणि केकी मुस यांचं प्रेम खरं होतं, ज्यामुळे केकी मूसचा निलोफरच्या वचनावर खूप विश्वास होता, त्याच आशेवरती त्यांनी आपल्या आयुष्याचा अखेरचा श्वास घेतला. परंतु निलोफर कधी आलीच नाही.

निलोफर पुढे लंडनला निघून गेली आणि अखेरपर्यंत ती आलीच नाही. पण केकी मुस तिची आयुष्यभर वाट पाहत राहिले. १९४५ च्या वर्षा पर्यंत निलोफरची १०-१२ पत्रं आली असे म्हणतात पण केकींनी त्यातलं एकही पत्र उघडून वाचले नाही कारण त्यांची अशी रोमँटिक कल्पना होती की, ‘ती ( प्रियशी निलोफर) आल्यावरच तिच्या आवाजातच ती, तिने लिहिलेले पत्र वाचेल.’

सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, केकी मुस गेल्यानंतर त्यांना दोन पत्रं सापडली. त्यातलं एक पत्र त्यांच्या प्रेयसीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरं केकींच्या एक नातलग हाथीखानवाला यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हाथीखानवाला यांनी त्या पत्रात केकींसांठी लिहिलं होतं की त्यांच्या प्रेयसीला लंडनला पाठवण्यात आलं आहे आणि तिकडं तिचं लग्नही करण्यात आलं आहे. मात्र, ते पत्र केकीं मुसनी कधीच वाचलं नसल्याचा खुलासा सामंत यांनी केला आहे.

केकी मुस चाळीसगावला पोहोचले कसे?

केकींचं पूर्ण नाव कैखुसरो माणेकजी मूस. मात्र त्यांची आई त्यांना ‘केकी’ म्हणायची. नंतर हेच नाव त्यांची ओळख बनलं. त्यांना बाबूजीदेखील म्हटलं जायचं. चाळीसगाव स्थानकाजवळ एक दगडी बंगल्यात ते राहायचे.

मुंबईतल्या मलबार हिलसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत ०२ ऑक्टोबर १९१२ मध्ये एका पारशी कुटुंबात पिरोजा आणि माणेकजी फ्रामजी मूस या आईवडीलांच्या पोटी केकींचा जन्म झाला.

आर. सी. नरिमन हे त्यांचे मामा मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक होते. तत्कालीन व्ही.टी स्टेशन अर्थात आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही त्यांनीच बांधलेली वास्तू आहे.

तर मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून केकी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. खरंतर वयाच्या नवव्या वर्षांपासून चित्र काढणाऱ्या केकींना कलाकार व्हायचं होते.

परंतु माणेकजींना वाटे की केकींनी त्यांची सोडा वॉटर फॅक्टरी व दारूचं दुकान सांभाळावं. दरम्यान 1934-35 च्या सुमारास केकी मूस यांचे वडील माणेकजींचं निधन झाल्यावर आई पिरोजाजींनी दुकानाची जबाबदारी स्वीकारली. पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये झाले होते आणि त्यानंतर कमर्शियल आणि फाईन आर्टस् मधला डिप्लोमा  घेण्यासाठी ते इंग्लंडला जाण्याचे ठरविले. केकींनी 1935 मध्ये लंडनमधील ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’मध्ये प्रवेश घेतला. केकींनी चार वर्षांत त्यांचा कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पूर्ण केला. 1938 मध्ये हा डिप्लोमा घेतल्यानंतर त्यावेळच्या धनिक लोकांमध्ये प्रथा होती त्याप्रमाणे शिक्षण पूर्ण करून जगप्रवासाला गेले होते.

याच अभ्यासक्रमात फोटोग्राफी हा विषय देखील होता. 1937 साली केकींनी त्याचाही अभ्यास केला. नंतर ‘रॉयल सोसायटी ऑफ आर्ट ऑफ ग्रेट ब्रिटन’ या संस्थेनं त्यांना मानद सभासदत्व दिलं.

त्यानंतर केकी अमेरिका, जपान, रशिया, स्वित्झर्लंडला गेले. तिथं फोटोग्राफीची अनेक प्रदर्शनं पाहिली. अनेक कलाकारांना भेटले आणि 1938 साली भारतात परत आले.

त्यानंतर ते मुंबईवरून चाळीसगावमध्ये आले आणि त्यानंतर जवळपास पन्नास वर्षें त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वत:ला आत्मकैद करुन घेतलं.

रेम्ब्राँ हा डच चित्रकार केकींचं प्रेरणास्थान होता. रेम्ब्राँ या चित्रकाराचा त्यांच्या मनावर खूप प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बंगल्याचे ‘आशीर्वाद’ हे नाव बदलून ‘रेम्ब्राँज रिट्रीट’ असं ठेवलं.

आयुष्यभर प्रेयसीची वाट बघत कलेमधे स्वतःला वाहून घेतलेल्या या महान कलाकारानं ३१ डिसेंबर १९८९ ला सकाळी ११ : ०० च्या सुमारास त्याच घरातून जगाचा निरोप घेतला.

दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांनी 1983 ला केकी आणि त्यांच्या छायाचित्रणावरील ‘केकी मूस – लाइफ अँड स्टिल लाईफ’ हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

‘व्हेन आय शेड माय टीअर्स’ हे केकींनी स्वतः लिहिलेलं स्वतःचं आत्मचरित्र अजून प्रकाशित झालं नसल्याची माहिती कमलाकर सामंत यांनी बीबीसी मराठीला दिली.

-कमलाकर सामंत

प्रसिद्ध छायाचित्रकार “केकी मूस” यांनी चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या जवळच्या रेम्ब्रा रिट्रीट येथे पन्नास वर्षे स्वतःला कोंडून घेऊन प्रेयसीची वाट बघण्यात घालवले

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started