आपला देश

आपला देश लाख वाईट असेल पण जोपर्यंत,

खच्चून भरलेल्या लोकलच्या डब्यात दुसऱ्याच्या कडेवरच्या लहान मुलाला मांडीवर घेऊन कोणीतरी खिडकीबाहेरची गंमत दाखवतं,

लेटमार्क लागू नये म्हणून धावणाऱ्या एखाद्याला दरवाजातले चार हात उचलून आत ओढून घेतात,

पुलावरच्या गर्दीत कुणीतरी टाकून दिलेला, हात पाय नसलेला भिकारी कुणाच्याही पायाखाली येत नाही, लोक त्याला पायही न लावता पुढे निघून जातात,

प्लॅटफॉर्मच्या कडेला उभं असलेल्या कुणालातरी कुणीतरी झपकन मागे ओढतं,  क्षणात एखादी लोकल धडधडत निघून जाते,

तोपर्यंत ह्या देशात जन्मल्याचा मला पश्चाताप होणार नाही,

दुचाकीवरून जाणाऱ्या एखाद्याची फाटकी टिफिन बॅग तुटून पडले आणि मागून येणारी मर्सिडीज तिला शिताफीने चकवून पुढे जाते, एखादा दुचाकीवाला थांबून ती उचलतो, पाहिल्याला देतो, दोघेही हसून निघून जातात,

खोदलेल्या रस्त्यावर एखादी दुचाकी घसरते, चारजण त्याला बसते करतात, पाणी पाजतात, थांबून कोणीच राहत नाही पण लगेच निघूनही जात नाही, शक्यतो कुणाला फार लागत नाही,

चढावर एखादा आपली बंद पडलेली मोटारसायकल ढकलत असतो, मागून कुणीतरी येतो, पाय लावतो, त्याला गॅरेज गाठून देतो, गाडी सुरू होते,

तोपर्यंत हा देश बंद पडेल असं मला वाटत नाही.

इथे लोकं कायदे मोडतात, पण सगळेच बेपर्वा नसतात. बेशिस्त असतात पण सगळेच बेशरम नसतात. माणसं भांडतात पण शक्यतो बंदुका काढत नाहीत, चार जण रस्त्यावर भांडतात तेंव्हा दहा जण समजावत असतात,

नियम वाकवले जातात पण किती वाकवायचे ह्याची चौकट शक्यतो पाळली जाते. प्रचंड स्पर्धा असलेल्या ह्या देशात माना पिरगळल्या जातात पण शक्यतो गळे कापले जात नाहीत. लोकं जगतात, जगण्याचा हक्क नाकारला जात नाही.

आणि हे जगणं स्वीकारलेले लोक हळूहळू ह्या देशाला चांगलं, अजून चांगलं करत नेतील हा विश्वास आहे तोपर्यंत ह्या देशात जगण्याला शाप म्हणावं असं मला वाटत नाही.

भारत ही पृथ्वीवरची सगळ्यात छान जागा नसेलही, भारतीय ही जगातली सगळ्यात चांगली ओळख नसेलही, भारतीय सरकार हे जगातलं सगळ्यात चांगलं सरकार नसेलही,

पण मी कोण आहे?

मी माणूस म्हणून सगळ्यात छान आहे? माणूस म्हणून माझे वागणे आदर्श आहे? नागरिक म्हणून माझे वागणे निर्दोष आहे?

माझ्यापुरते ह्याचे उत्तर नाही असेच आहे आणि म्हणूनच मला मिळालेला देश, समाज आणि सरकार माझ्या लायकीनुसार मिळाले आहे असे मी समजतो.

ह्या सगळ्या गोष्टी सुधारण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःला सुधारणे, मागण्याच्या आधी देणे, बोलण्याच्या आधी करून दाखवणे, रडण्याचा आधी चार लोकांना जगवून दाखवणे.

जोपर्यंत हे तुम्हांला जमत नाही तोपर्यंत ना हा देश सुधारेल, ना इतर कुठला देश तुम्हांला बोलावेल..

कारण आपली किंमत आपल्याला माहीत नसली तरी जगाला माहीत असते, दोन्ही अर्थानी..
लेखक माहिती नाही, पण छान लिहलंय 🙏🙏

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started