आखाड महीना

             आखाडात मरीआई आणि म्हसोबाचा रुबाब तर असतोच पण तोंडाला शेंदूर फासून अभ्राणात मिरवणाऱ्या पोतराजालाही भाव चढतो.
सतराशेसाठ रूढी परंपराच्या डबक्यात लोळणाऱ्या सकल समाजाला आखाड ही पर्वणी असते.
ग्रामीण भागात याच्या जोडीला आणखी एक पात्र जोमात असते ते म्हणजे साती आसरा.
हे पात्र जरा हॉरर कॅटेगरीत मोडणारे आहे.
याची खानेसुमारी स्त्री पिशाच्चात (?) केली गेलीय.
आत्म्याला आणि भूताला लिंग असते का असा खोचक सवाल आपल्या लोकांना पडत नाही. साती आसरा या अप्सरारुपी हडळीच आहेत असं अजूनही अज्ञानात खोल बुडालेल्या समाजाला वाटते.
स्त्री पिशाच्च प्रकारामध्ये हडळ या नावातच एक जरब भिती व धाक आहे नुसत्या उच्चारानेही काही भोंगळ लोकांना कापरे भरते.
जिथे जिथे जलाशय असतात, तिथे तिथे साती आसरा (जलदेवता/ अप्सरा/ हडळी) असतात, अशी लोकधारणा आहे…

खरे पाहता साती आसरांच्या भासाची साधी गणिते आहेत.
आत्यंतिक शांततेपायी विहिरीत रात्रीच्या वेळी हमखास इको साऊंड येतो,
विहीर जितकी खोल तितका आवाज जास्त घुमत जातो.
विहिरींच्या काठालगत लिंब, जांभूळ, वड, पिंपळ, अशोक अशी झाडे हटकून असतात.
वारं बेफाम वाहीलं की यांच्या पानांपानातून तऱ्हेतऱ्हेचे आवाज येतात हेच आवाजात विहिरीच्या खोलगटपणामुळे वेगळ्या परीमाणात ऐकू येतात. अशातच भितीपोटी पालापाचोळ्यातून निघणारा कसलाही आवाज विचित्रच वाटतो त्याचे अतिशय भितीत रूपांतर होते
याच दरम्यान विहिरीजवळून रात्रीच्या वेळी कोणी आगंतुक जात असेल तर त्याच्या डोक्यात आधीच भीतीचा पगडा बसलेला असतो तो किंचाळतच सुटतो.
मग प्रत्येक जण आपापल्या परीने त्यात तिखटमीठ लावून भर घालून सांगू लागतो आणि त्या विहिरीत साती आसरा असल्याचा शोध लागतो.

अगदी या एक दोन दशकापर्यंत सासूरवाशीण स्त्रियांना विहिरीत, आडात ढकलून मारण्याचे प्रमाण मोठ्या आकडेवारीत होते.
याशिवाय असाध्य रोगाने ग्रासलेल्या स्त्रिया त्यांचा दवाखाना नीट न केल्यामुळे विहिरी जवळ कारायच्या आणि आपले जिवण संपवून घ्यायच्या ते वेगळंच.
एखादी आई आपल्या पोराबाळांना घेऊन जीव द्यायची त्याची तऱ्हा अजून वेगळी आहे. विहिरीत कुण्या बाप्याने जीव दिल्याचे क्वचित समोर येते.
जुन्या काळी आडरस्त्यात अशा विहिरीत अनेक बायकांचे बळी गेले.
मग त्यांचे मुडदे तरंगून वर येऊन कुणाच्या नजरेस पडू नयेत यासाठीही साती आसराची भीती खूप कामी यायची.
दळणवळणाची साधने शून्य आणि लोकांच्या मनातल्या भीतीने अशा विहिरीकडे कोणी फिरकत नसे त्यामुळे मृतदेह पार फाटून तुटून गेल्यावर तो प्रकार ध्यानी येई.
कुणाची कोण त्यात मरून जायची ते उमजत नसे.
मग त्या विहीरीतल्या मृत बाईची जरब आणखी वाढे.
गावाकडे कोष्टयाच्या भल्या मोठ्या विहिरीत आजवर साताठ बायकांनी जीव दिलाय. काहींना ढकलून दिलेय तर काहींवर ती वेळ आणली गेली तर काही मोजक्याच बायका अशा होत्या की ज्यांनी सासरच्या त्रासास कंटाळून जीव दिला. मात्र हे सगळे मृत्यू एकाच वर्गवारीत नोंदले गेले आणि वरती मल्लिनाथीही झाली की,”कोष्टयची विहीर बायकापोरींना आत खेचते!”
तर अशा पद्धतीने विहीर बाया ओढती असे सांगायला बापे सर्रास मोकळे होतात. खऱ्या साती आसरा विहिरीत नसून पुरुषी समाज रचनेच्या उतरंडीत दडून बसल्या आहेत.

साती आसराची पूजा डोळे दिपवणारी असते.
त्यासाठी बऱ्यापैकी पैसा, वेळ आणि श्रम खर्च होतात. घरातल्या बाईचा नैवेद्य करून पिट्टा पडतो.
माणसांच्या खादाडीच्या सोयीनुसार काही भागात मांसाहारी नैवेद्यही केला जातो.
आधी भीतीचे दुकान मांडायचे आणि नंतर त्यातून स्त्रियांची पिळवणूक करायची हा यातला ठळक मुद्दा.
जनतेच्या मनातील भीतीचा फायदा घेऊन लोक एखाद्या चांगल्या स्त्रीला भूत पिशाच्च ठरवून वा जादूटोणा करणारी ठरवून मरेपर्यंत मारतात.
एखादी मानसिक संतुलन बिघडलेली मुलगीसुद्धा याची बळी ठरते.
विशेष बाब म्हणजे आषाढ सरला की उकिरडयाजवळचे म्हसोबा आणि मरीआई अपूजनीय होतात.
त्यांना नैवेद्य घेऊन येणारे रोडावत जातात.
कुत्री देखील तिथे पाय वर करून त्यांना ओले करून जातात तर साती आसरा वर्षभर आराम करतात. इकडे पोतराज मंडळी अन्नाला महाग होतात.

एखादा पडका वाडा, नदी, डोह, ओढा, विहीर, तळी यासारख्या पाण्याच्या ठिकाणी साती आसरा राहतात असं अजूनही खेडोपाडी मानलं जातं. ही एक भयंकर अंधश्रद्धा आहे.
जे लोक साती आसरांची बाधा झाल्याचा दावा करतात त्यांना बांगड्यांचा आवाज, बाळ रडण्याचा आवाज येणे असे भास होतात. काहींना बऱ्याच वेळा केस जळल्याचा वास येतो. वास्तवात हा सारा मनाचा खेळ असतो.
आसरा हा शब्द अप्सरा या शब्दापासूनच झाला आहे.
या आसरांना दृश्यमान होण्याची हौस नसते.
फक्त झपाटणे हा प्रकार दिसतो. निपुत्रिक स्त्री, जिवंतपणी जेवण न मिळाल्याने उपाशी राहणाऱ्या स्त्रिया, जेवणाची प्रचंड आस असणाऱ्या स्त्रिया यांची या प्रकारात लोक गणना करतात. गंमत म्हणजे निपुत्रिक हा शब्द रुढ आहे, निकन्यिक असा शब्द आजवर तरी मी वाचला नाही. असो.
तर निपुत्रिक पुरुषाला मात्र अशी कुठली बाधा कधीच कशी काय होत नसावी याचे शास्त्र काही केल्या कळत नाही!

काही लोक तर याची पुढची पायरी गाठून सांगतात की साती आसरा हा प्रकार पवित्र आहे त्यामुळे यांना फक्त झपाटणे इतकेच माहित आहे. हा प्रकार झाल्यानंतर स्नान करून येताच डोळे लाल भडक होणे, जबर विस्मरण होणे असे प्रकार होतात याची संख्या सात आहे असे म्हणतात म्हणून यांना साती आसरा म्हटले जाते.
भर म्हणजे या साती आसरांना एक भाऊ असल्याचे मानले जाते. त्याचे नाव ‘झोटिंग’ असे सांगितले जाते. प्रसुतीनंतर लगेच मृत्यू पावलेल्या स्त्रिया, रजस्वला, विधवा स्त्रिया यांना साती आसरा झपाटून टाकतात आणि विहिरीत बोलावून मारतात असं आजही समजलं जातं. बाईला जिवंतपणे पाण्यात ढकलून ठार मारण्यासाठी किती मोठं कुभांड आपल्या लोकांनी रचलं आहे याची या सर्व प्रकारावरून कल्पना येते.

विशेष गोष्ट म्हणजे आता मध्यम आणि मोठ्या आकारांच्या शहरात देखील आखाडपूजेचे स्तोम वाढताना दिसू लागलेय.
गळक्या परंपरांचे मडके डोक्यावर वाहणारा आपला समाज कधी शहाणा होणार याचे नेमके उत्तर काही केल्या मिळत नाही हे खरेच आहे.

विशेष सुचना:- वरिल सर्व माहीती विविध वर्तमानपत्रे, पुस्तके, आणि इतर मजकूर व बातम्या अशा माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून सदर माहिती जमा करीत आसताना या मध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सुचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधावा. rohidasshivajimalage3@gmail.com
Mobile No:- 9604939252

-®रोशिम.✍️

Design a site like this with WordPress.com
Get started